
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने आज सायंकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी दिली. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीत नायक आणि खलनायक म्हणून त्यांनी अनेक महत्वाच्या महत्त्वाची भूमिका निभावल्या. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.
वयोमानामुळे रमेश देव यांची प्रकृती खालावत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव लवकरच एका मालिकेतही दिसणार होते. रमेश देव यांनी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात सिनेसृष्टीत पदार्पण केले. बॉलिवूडमधील खलनायकाच्या अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या. आनंद सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर राहिलीय. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकेत त्यांनी भारदस्त कामगिरी करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती. प्रेक्षकांनीही त्यांना नायक आणि खलनायक अशा दोन्ही व्यक्तिरेखेत स्वीकारले. दरम्यान अवघ्या ३ दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जानेवारी २०२२ ला रमेश देव यांचा ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने देव यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

रमेश देव यांनी आतापर्यंत २८५ हिंदी चित्रपट, तर १९० मराठी चित्रपटात भूमिका केलीय. तसेच ३० हून अधिक मराठी नाटकात कामे केलीत. त्याचप्रमाणे रमेश देव यांनी अनेक मराठी चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शनवरील अनेक मालिकांत काम केले असून, अनेक मालिका दिग्दर्शितही केल्यात. सिनेक्षेत्रातील त्यांच्या अजरामर कारकिर्दीसाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय.
रमेश देव यांचा जन्म अमरावतीत झाला पण ते प्रत्यक्षात जोधपूर राजस्थानचे आहेत. त्यांचे मोठे आजोबा अभियंता होते आणि वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. रमेश १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून “पटलाची पोर” चित्रपटात दिसले. त्यांनी ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत. अभिनय हा चित्रपट दिग्दर्शक आहे, त्याने २०११ मध्ये ‘दिल्ली बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजिंक्य हेदेखील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत.
रमेश देव यांचे वडील कोल्हापूरचे न्यायाधीश होते. त्यांचे आजोबा इंजिनीअर असल्याने ते कोल्हापुरात स्थलांतरित झाले होते. २०१३ मध्ये रमेश देव यांना ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आंधळा मागतो एक डोळा, देवघर, साता जन्माची सोबती, पैशांचा पाऊस, सुवासिनी, माझी आई, भाग्यलक्ष्मी, माझा होशील का?, पत्नी, परदेस, दर्पण, दस लाख, मुजरिम, खिलोना, जीवन मृत्यू यांसारख्या अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. आरती हा त्यांच्या पहिला बॉलिवूड सिनेमा होता.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा रमेश देव यांनी श्रद्धांजली अर्पण केलीय. ज्येष्ठ चरित्र अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलंय.
याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही भावना व्यक्त केल्यात. ही सर्वात मोठी दुख:द बातमी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीतला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट आपल्यातून गेलाय. अतिशय उत्तम नट आणि चांगले माणूस होते. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. तसेच ते मला माझ्या मोठ्या भावासारखे होते. ते नेहमी मला धाकट्या भावासारखे मानायचे. चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर मी त्यांच्यामुळे उभा राहिलो. त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी आठवण आहे. तसेच त्यांच्यासोबत मी बरेच चित्रपट केले. ३० जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असताना माझं त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं, अशी आठवणही अशोक सराफ यांनी सांगितलंय.

मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी वढवल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.
रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी १९६२ मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) यांच्यासोबत लग्न केलं. या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे दाम्पत्य आपल्या लग्नाची ५९ वर्षे पूर्ण करणार होते. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसह मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देव यांची पत्नी सीमा देव यादेखील अल्झायमर या आजारानं त्रस्त असल्याची माहिती अजिंक्य देव यांनी दिली होती.
शंभर वर्ष जगण्याची इच्छा
रमेश देव यांच्या निधनावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोलताना दुःख व्यक्त केलं आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या गप्पामध्ये रमेश देव यांनी आपल्याला शंभर वर्ष जगायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती.




