आता १०० टक्के इथेनॉलवर धावतील वाहने : पियुष गोयल

नवी दिल्ली : दीर्घकालीन कालावधीत १०० टक्के इथेनॉलवर गाडी चालवण्याचे सरकारचे लक्ष्य असून, वर्ष २०२३-२४ पर्यंत सरकारने २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे टार्गेट ठेवले आहे, असे उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले. गोयल म्हणाले की, बॅटरी तंत्रज्ञानाची मागणी येत्या काही दिवसांत लक्षणीय वाढणार आहे. रिन्यूएबल सेक्टर बरीच प्रगती होईल, ज्यामुळे बॅटरी उद्योगाचा देखील विकास होईल.
सीआयआय आयोजित आत्मनिर्भर भारत परिषदेला संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, रिन्यूएबल ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू, ज्याच्या मदतीने पेट्रोलऐवजी १०० टक्के इथेनॉलवर वाहने धावतील. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे त्यांना आवाहन आहे की त्यांनी केवळ सौर उर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जीच्या मदतीने आपली कार रिचार्ज करावी. यासाठी भविष्यात चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.
गोयल म्हणाले की, २०२२ पर्यंत रिन्यूएबल एनर्जीचे लक्ष्य १७५ गीगाव्हॅट निश्चित केले गेले आहे, तर २०३० पर्यंत रिन्यूएबल एनर्जीचे लक्ष्य ४५० गीगाव्हॅट आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिक्सिंगचे लक्ष्य ठेवले केले.
तत्पूर्वी सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष्य पाच वर्षांपूर्वी शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या देशात पेट्रोलमध्ये जवळपास ८.५ टक्के इथेनॉल मिसळले जाते.
रिन्यूएबल एनर्जीच्या वापराबद्दल भारत खूप जागरूक आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यात २५० टक्के वाढ झाली आहे. भारत जगातील अशा पाच देशांमध्ये आहे जिथे रिन्यूएबल एनर्जीचा सर्वाधिक वापर केला जात आहे. हवामान बदल परफॉर्मन्स इंडेक्समध्येही पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अर्थव्यवस्था व पर्यावरणाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.