राजस्थान भाजपमधील वाद चव्हाट्यावर’; ‘वसुंधरा लाओ’साठी समर्थक आक्रमक
जयपूर : राजस्थानात काँग्रेसमध्ये कलह सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंसाठी त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत. ‘वसुंधरा लाओ’ ही मोहीम हाती घेतानाच ‘वसुंधरा म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच वसुंधरा’ असा नाराही वसुंधरा राजे समर्थकांनी लगावला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपचे माजी आमदार प्रल्हाद गुंजल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर भाजपचे माजी मंत्री भवानी सिंह राजावत यांनीही पत्रकार परिषद घेतली. देशात ज्या पद्धतीने भाजपसाठी मोदींचं स्थान आहे. त्याचप्रमाणे राजस्थानात भाजपमध्ये वसुंधरा राजे यांचं स्थान आहे. राजस्थानात वसुंधरा राजेंशिवाय कोणताही चेहरा चालणार नाही. संपूर्ण पक्ष वसुंधरा राजेंमुळेच सत्तेत आला आहे. वसुंधरा राजे नसत्या तर भाजप सत्तेत आला नसता, असा दावा राजावत यांनी केला. तसेच राज्यातील प्रदेशाध्यक्षांकडेही तेवढी कुवत नसल्याचं ते म्हणाले.
राजावत यांची पत्रकार परिषद होत नाही तोच माजी मंत्री प्रतापसिंह सिंघवी आणि माजी मंत्री रोहिताश शर्मा यांनीही मैदानात उडी घेतली. राजस्थानात मुख्यमंत्रीपदाचे १५ दावेदार भाजपमध्ये फिरत आहेत. त्यांना कोणीही विचारत नाही. भाजपला सत्तेत यायचं असेल तर वसुंधरा राजेंशिवाय पर्याय नाही. नाही तर राज्यातून पक्ष संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला. वसुंधरा राजेंसाठी एक डझन माजी खासदार आणि माजी आमदार मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, अचानक वसुंधरा राजे समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने भाजपचे प्रदेश नेतृत्वही हैराण झाले आहे. भाजपमध्ये हा अवकाळी पाऊस का सुरू झाला तेच कळत नाही. अजून निवडणुकीला अडीच वर्षे बाकी आहे. आमच्या पक्षाचे काही नेते काँग्रेससोबत हातमिळवणी करून षडयंत्र रचत आहेत. भाजपमधील कलह चव्हाट्यावर आणून काँग्रेसमधील वादावर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. कारण मुख्यमंत्रीपदासाठी संघर्ष करण्याची ही वेळच नाही, असं सांगतानाच भाजप हा व्यक्तिनिष्ठ पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणीही पक्षापेक्षा मोठा नाही, असं गुलाब चंद कटारिया यांनी सांगितलं.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष सतीश पुनियाही या वादाने हैराण झाले आहेत. नेत्यांकडून शिस्त भंग केला जात आहे. त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपचं संसदीय बोर्ड ठरवतं. घरात बसलेले नेते ठरवत नाही. हा कार्यकर्त्यांना पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, असं पुनिया यांनी सांगितलं. तर या सर्व प्रकारावर वसुंधरा राजे यांनी मौन साधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.