राजकारण

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन

ठाणे : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ पासून ठाण्यात आहेत. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. ठाण्यात शिवसेनेची पहिले सत्ता आली आणि ठाणे नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. ठाणे नगरपालिकेत पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष वसंत मराठे यांच्या रूपाने बसला. सत्तेची पहिली संधी शिवसेनेला ठाणे नगरपालिकेने दिली. यावेळी १३ ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला होता.या निवडणुकीत जनसंघाचे ८, प्रजा समाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले. ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी अ‍ॅड. अरविंद दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले होते. दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सत्तेची पहिली मुहूर्तमेढ रोवणारा शिलेदार हरपला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

१९७३ साली शिर्डीच्या साईबाबांनी स्वप्नदर्शन देऊन त्यांचं जीवन बदलून टाकलं. मग त्यांनी राजकारण संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. वसंत मराठे यांनी १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचं अखेरपर्यंत जीवित कार्य राहिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button