राजकारण

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण

उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर सांबरे

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या मंगळवारी झालेल्या निवडणूकीत प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता असून पक्षांतर्गत ठरलेल्या धोरणानुसार सव्वा वर्षानंतर अध्यक्ष भारती कामडी यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला. तर ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्याने उपाध्यक्ष निलेश सांबरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त झाल्याने आज या पदांकरिता निवडणूक झाली. अध्यक्ष पदाकरिता शिवसेनेकडून वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानेश्वर सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत विरोधी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेनेचे संपर्कनेते आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा, माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button