आरोग्य

पुरेसा साठा नसल्याने आज मुंबईत लसीकरण बंद !

मुंबई : देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहिमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (बुधवारी) दिनांक ४ ऑगस्ट, २०२१ रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

गेल्या महिन्यात देखील मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे लसीकरण कमी झालं होतं. आता साठा प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर ओढवली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button