राजकारण

उत्तर प्रदेश पोलिसांची क्रूरता; लहान मूल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण !

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून यूपी पोलिसांच्या क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या कडेवर लहान मूल असतानाही पोलिसांकडून त्याव्यक्तीला बेदम चोप दिला जातोय. लहान मूल जोराने रडत आहे, तरीही कर्मचारी लाठ्या मारणे थांबवत नाहीत. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी एसएचओला तंबी देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ कानपूरच्या ग्रामीण भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत वरुण गांधी म्हणतात, मजबूत कायदा आणि सुव्यवस्था दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी असते. पण, न्याय मागणाऱ्यांवरच अत्याचार होत आहे.भक्कम कायदा आणि सुव्यवस्था अशी असते जिथे पोलिसांचा नाही तर कायद्याचा धाक असतो. हे दृष्य अत्यंत क्लेशदायक आहे, असे ते म्हणाले.

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला पोलिसांकडून लाठ्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. यादरम्या तो विनवणी करतो की, मारू नका मुलाला लागेल. पण, पोलीस कर्मचारी थांबत नाहीत आणि त्याला मारहाण सुरुच ठेवतात. थोड्या वेळानंतर त्याच्या कडेवर असलेल्या मुलाला पोलीस जबरदस्तीने हिसकाऊन घेतात आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतात. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी खोदकाम सुरू आहे, यादरम्यान माती उडून रुग्णालयात येत आहे. या खोदकामाचा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून विरोध सुरू होता. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे गेटही बंद केले होते, पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, काही कर्मचारी ऐकयला तयार नव्हते. अशात पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला, यादरम्यान रजनीश शुक्ला पोलिसांच्या हाती सापडला. तोही या विरोध प्रदर्शनात सामील होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button