उत्तर प्रदेशातही दहावी-बारावीची परीक्षा स्थगित
लखनऊ : सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश शिक्षण मंडळानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ११ जणांच्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्व शाळा १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुढील आदेशापर्यंत बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
यूपी बोर्डाच्या परीक्षांबाबत सध्या तरी नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मे महिन्यात त्याबाबत विचार केला जाईल. यूपीमध्ये बोर्ड परीक्षा एप्रिलला नियोजित होत्या. त्यांची तारीख पुढे ढकलून ८ मेपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता ही तारीखही पुढे ढकलली आहे. नुकतंच यूपीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दिनेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात दहावी-बारावीचे जवळपास 56 लाख विद्यार्थी परीक्षा देतात.