आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार : चंद्रकांत पाटील
पुणे : भाजपाचा आज ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वाय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीचे सरकार कमालीचे अडचणीत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shiv sena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी काळातील आघाड्यांबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
पुढील आठवड्यात आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गिरीश महाजन यांचे ट्विटवरून टीकास्त्र
अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक ट्विट भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी केले आहे. भाजपचे संकटमोटक नेते म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी एकामागून एक अनेक ट्विट्स करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. निगरगट्ठ ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र, जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी ट्विटरवरून केली.