मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचं म्हटलं आहे. राणे यांनी जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याची मागणी केलीय. राणे यांनी हे पत्र २९ सप्टेंबर रोजी लिहलं आहे.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद सर्वांनाच माहिती आहे. राणे कुटुंबीय ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना माननीय म्हणत २९ सप्टेंबर रोजी एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ३८ रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. “सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची गरज पाहता व सद्यस्थितीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील ३८ प्राथमिक केंद्राना रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांचा रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रस्ताव अजूनही प्रलंबितच आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राणे यांनी या पत्रात केली आहे.