Top Newsराजकारण

अजित पवारांना ओळखत नाही, आदित्य आणि मांजराचा संबंध काय, भास्कर जाधव नाचे !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल

मुंबई/कणकवली : संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आ. नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. परवापासून नितेश राणे नॉट रिचेबल असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नितेश राणे कुठे आहेत, असे विचारले असता ते भडकले. कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का? असा प्रश्न असतो का? जरी मला माहीत असेल तरी तुम्हाला का सांगू, असा सवाल त्यांनी केला. अनिल देशमुखही काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवणही राणे यांनी करून दिली. तसेच अजित पवारांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये केलेल्या वक्तव्यावर कोण अजित पवार, मी त्या अजित पवारला ओळखत नाही. ज्याच्यावर बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत, त्याचा रेफरन्स विचारताय, अशा शब्दांत नारायण राणेंनी अजित पवारांवर टीका केली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण या विषयावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्ला चढविला आहे. याचबरोबर राणे यांनी नितेश राणे यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांचाही समाचार घेतला. उजव्या बाजुला छातीवर खरचटले तर पोलीस ३०७ कलम लावतात. ते काय डोके, हृदयाचा भाग आहे का? असा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला आहे. कोणतीही कलमे लावा आम्ही त्याला घाबरत नाही, असे आव्हान राणे यांनी पोलिसांना आणि सरकारला दिले आहे. याचबरोबर भास्कर जाधव यांच्यावर शरसंधान साधताना कोकणात काही भागात नाचे आहेत, होळीला पैसे घेऊन नाचतात ते. विधानसभेत तोच प्रकार झाला, आता आम्ही नाचे म्टटले तर तुम्ही म्हणाल मलाच म्हटले, असा टोलाही त्यांनी लगावला.

नितेश राणेने कुठे आवाज काढला, म्याव म्यावचा आणि आदित्य ठाकरेचा संबंध काय? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं असेल तर आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? असा सवाल त्यांनी केला. सरकारी तीनपक्षाचे असले काय आणि चार पक्षाचे काही फरक पडत नाही, कारण मुख्यमंत्रीच नाही. राज्यात सरकार आहे असे वाटत नाही, असा आरोपही राणे यांनी केला.

पोलिसांकडून नितेश राणेंच्या अटकेची कारवाई सुरू असल्याच्या चर्चा आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कारवाईवरून राज्य सरकारवर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याकडे सत्ता आल्यास त्यांनी केलेले गैरप्रकार उघड होतील. त्या भीतीतून नितेश राणे यांना गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राणे यांनी केला. एका आमदारासाठी एवढी मोठी यंत्रणा कामी लावली आहे. एखाद्या दहशतवाद्यासाठी तरी यंत्रणा कामाला लावली होती का, असा मुद्दाही राणे यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button