केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
नवी दिल्ली : सहकार परिषदेनिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. यादरम्यान ते पुणे आणि शिर्डीला भेट देतील.
शाह १८ डिसेंबरला शिर्डीत येणार आहेत. साईबाबांचे दर्शन ते घेतील. त्यानंतर पहिल्या सहकार परिषदेला ते उपस्थित राहतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे विविध नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा इथं देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसंच विचारमंथनही होणार आहे. भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे-पाटील यांनी या सहकार परिषदेचं आयोजन केलंय. सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहे. सहकाराच्या स्थितीवर या परिषदेत चर्चा होणार आहे. अमित शाह सहकार क्षेत्रासंदर्भात या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराबाबत राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शाह यांचा हा दौरा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सहकार तज्ज्ञ शरद पवार यांना मात्र राज्यातील सहकार परिषदेचं अद्याप निमंत्रण नाही, असं समजतंय. परिषदेचे आयोजक आणि पवार कुटुंबीय यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे त्यांना बोलावलं जाईल की नाही, याविषयी उत्सुकता आहे.
अमित शाह हे १९ डिसेंबरला पुणे दौरा करण्याची शक्यता आहे. त्यात पुण्यातील विकासकामांचं उद्घाटन ते करतील. त्यानंतर ते मेळावा घेण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शाहांच्या या राजकीय दौऱ्याकडे पाहिलं जात आहे.