
मुंबई ” शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवायांबाबत आज संध्याकाळी शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेमधून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. मात्र दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुंबईमध्ये व्यापक तपास मोहीम सुरू असून, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेला एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
ईडीकडून मुंबईतील दहा विविध ठिकाणी ही छापेमारी सुरू असून, त्यामधून या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे यामधून काही नवं कनेक्शन समोर येतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला नेता ईडीच्या रडारवर आहे. अंडरवर्ल्ड आणि दाऊद इब्राहीमशी कनेक्शन असलेल्या एका व्यक्तीच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीकडून मुंबईमधये ही छापेमारी सुरू आहे. या संदर्भात एनआयएकडून गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर ईडीकडून ही कारवाई सुरू आहे.