राजकारण

उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट : संजय काकडे

पुणे: भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली २५ वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांचा टोला

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काकडे यांच्या विधानावर जहरी टीका केली आहे. भाजपचे सरकार असताना केवळ सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्यांनी राजकीय भाष्य करू नये. या धंदेबाज लोकांनी राजकारणात पडू नये. त्यांनी त्यांचं काम पाहावं. आमचं सरकार कसं चालवायचं हे आम्ही पाहू, असा सल्ला मलिक यांनी काकडेंना दिला आहे.

प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button