मुंबई: उद्धव ठाकरे इतिहासातील निवडक घटना सांगतात. त्यांच्या सोयीचा इतिहास मांडतात. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी घेतला होता. २०१० पर्यंत तेच या युतीचे नेते होते. त्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना सडवली असं तर उद्धव ठाकरेंना म्हणायचं नाही ना? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. भाजपसोबतच्या युतीचा निर्णय वंदनीय बाळासाहेबांचा होता. त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली, यांना राजकारणाचा गजकर्ण झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोयीस्कर इतिहास सांगतात. त्यांनी पूर्ण इतिहास सांगायला हवा, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. राम जन्मभूमी आंदोलनानंतर उत्तर भारतात शिवसेनेची लाट होती. त्यावेळी शिवसेनेनं उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली असती तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. या विधानाचा फडणवीसांनी आकडेवारीसह समाचार घेतला. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेनं १८० उमेदवार दिले होते. त्यापैकी १७९ जणांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतरच्या निवडणुकीत सेनेनं २४ उमेदवार दिले. त्यापैकी २३ जणांचं डिपॉझिट जप्त झालं होतं, अशी आकडेवारी फडणवीसांनी सांगितली.
शिवसेना जन्माला येण्याआधी मुंबईत आमच्या पक्षाचे नगरसेवक, आमदार होते. १९८४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढले होते. त्यामुळे कोण कोणाच्या मांडीवर होतं हे लक्षात येईल, असं फडणवीस म्हणाले. शिवसेना आमच्यासोबत असताना राज्यात होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायची. आता आम्ही सोबत नसताना ते चौथ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व केवळ कागदावर आहे. भाषणाच्या पलीकडे हिंदुत्व उरलंय कुठे, असा सवाल फडणवीसांनी विचारला.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय केला होता, त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे. त्यांना आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली होती, शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, असंही फडणवीस म्हणाले.
गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरेंवर केलेलं एक ट्विट दाखवावं; शिवसेनेला आव्हान
सत्तेसाठी ज्या काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्या गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासही एक ट्विट तरी केले का, असेल तर दाखवावे, असे आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला पंतप्रधान मोदींपासून शाहपर्यंत अनेकांनी ट्विट करत आदरांजली वाहिली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीयच आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारे साधे ट्विटही केले नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.
सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग जितका महाराष्ट्रात झाला, मला काळजी वाटते, महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 24, 2022
दिल्लीत २०१४ मध्येच भगवा फडकला आहे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 24, 2022
महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकदा तरी बोला.
चौथ्या क्रमांकावर आल्याचा राग भाजपवर कशाला काढता?
चोऱ्या कराल तर ED, CBI कारवाई करणारच.
तुम्ही तर आमच्या एका कार्यकर्त्यांकडे २५ पोलिस पाठविता: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 24, 2022
भाषणाच्या पलीकडे शिवसेनेचं हिंदुत्व काय?
शिवसेनेने हिंदुत्व शिकवू नये. रामजन्मभूमीसाठी आम्हीच प्रयत्न केले. रामजन्मभूमी आंदोलनात लाठ्या, काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. रामजन्मभूमी, बाबरी हे विषय सोडून द्या, ते तर मोदींनी करुन दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात मंदिर उभं राहत आहे. पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा, श्रीमलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशाला राजनन्मभूमीच्या गप्पा मारता. भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय?, असा सवाल फडणवीसांनी यावेळी विचारला.
सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं, तर २५ पोलीस कार्यकर्त्याच्या घरी गेले
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपाला टोला लगावला होता. तसेच, ईडी, सीबीआयच्या कारवाईवरुनही फटकारले. आता, फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून होत असलेल्या सत्तेच्या गैरवापराबद्दल सांगितलं. ईडी किंवा सीबीआय हे जेव्हा तुम्ही चोऱ्या कराल, तेव्हाच ते काम करेल. इकडे राज्यात तुम्ही वापरताय ना, आम्ही एखादं ट्विट केलं तरी आमच्या लोकांना जेलमध्ये टाकताय. राबडीदेवी ही काय शिवी आहे का?, तर सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटल्यामुळे पुण्यातले २५ पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घरात जातायंत. आम्ही काय समर्थन नाही केलं, म्हणूनच शिवसेनेकडून रडीचा गेम खेळला जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.
नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झालाय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राज्यभर भाजपाची आंदोलनं सुरू आहेत. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसंच राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आणि चपलाचा हार घातला जात आहे. काही ठिकाणी रस्तारोको आंदोलन केलं गेलं. नाना पटोलेंच्या याच विधानाचा समाचार फडणवीस यांनी घेतला आहे.
नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. त्यांच्या पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं, असं फडणवीस म्हणाले.