Top Newsमुक्तपीठराजकारण

राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरेही मराठी सन्मान मोर्चात सहभागी होणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार

मुंबई : शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदीचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे ठाकरे बंधू ५ जुलैच्या मोर्चात एकत्र येणार आहेत. पक्षांचा झेंडा बाजूला ठेवून केवळ मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र येण्याच्या राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैच्या सहभागी होण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ही सहभागी होणार आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५ जुलैला हिंदीसक्तीविरोधात दोन्ही पक्षाचा एकच मोर्चा निघणार असल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलात बैठक होऊन त्यात मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजकीय व्यासपीठावर प्रथमच दोन ठाकरे एकत्र येणार असून, महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही मोठी घडामोड असणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा व पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्यभर वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीसक्तीविरोधात ५ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही याच विषयावर २९ जून व ७ जुलै रोजी आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.

मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल, असे स्पष्ट करत सर्वपक्षीय लोकांनी, पालक आणि विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी आपण स्वतः सर्वपक्षीय नेत्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी परवाच स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे यांना पण आपण बोलावणार का या प्रश्नावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत ते पण आलेच ना असा प्रतिप्रश्न करताना, त्यांच्याशीही मी बोलणार आहे. माझी माणसे त्यांच्या माणसांशी बोलतील असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार राज ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला आणि एकत्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला. खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

राज ठाकरे यांनी आपल्याशी संपर्क करून, हिंदी सक्ती विरोधात, मराठी भाषेसाठी एकत्र आले पाहिजे, दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांची ही भूमिका मी उद्धव ठाकरे यांना कळवली. त्याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मी राज ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी देखील ते तत्काळ मान्य केले. ५ तारखेला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. त्याला विरोध होत आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे हिंदी भाषेचे ओझे आमच्या मुलांना पेलवणार नाही, असे भाषातज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण, शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. या त्रिभाषा सूत्रतून गुजरात राज्याला मात्र वगळले असून महाराष्ट्रावर सक्ती केली जात आहे. राज्याच्या मनात जे आहे, ते मी करेन, असे उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते. सुप्रिया सुळे यांनी देखील या विरोधात भूमिका मांडली होती.

त्यामुळे हा सर्व निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील आहे. आम्हाला लढावे लागेल आणि त्याचे नेतृत्व ठाकरेंनी करावे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच पाहिजे, ही महाराष्ट्राची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या मनातही तेच आहे. या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत, असे राऊत म्हणाले. मोर्चा कसा असेल? वेळ कोणती असेल? याविषयी आम्ही आता चर्चा करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे.

सकाळी १० वाजेची वेळ निश्चित झाली होती. मात्र, ती वेळ सोईची नाही, त्यामुळे या वेळेत बदल करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे हे नवे समीकरण पुढील काळात अधिक व्यापक होणार का ? याकडे लक्ष असणार आहे.

मोर्चानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल!

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकत्र येणार असून हा राजकीय मोर्चा नसून याचे नेतृत्व मराठी माणूसच करणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संजय राऊतांशी चर्चा केली. सर्वानुमते ५ जुलै ही मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष, साहित्यिक, मराठी माणूस एकत्र येणार आहेत. मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार

राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.

मोर्चाला शरद पवार गटाचा पाठिंबा

दरम्यान, पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाविरोधातील मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे.राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही. पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे. जो योग्य आहे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार. महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे, असे जयंत पाटील यांनी एक्स या समाज माध्यमातील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तिसरी भाषा का गरजेची; मुख्यमंत्र्यांचे उत्तर

तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्द्यांसह विरोधकांचे सर्व दावे खोडून काढले. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या विषयावर स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिले. या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे स्पष्ट केले की राज्यात फक्त मराठी सक्ती आहे. हिंदी भाषा हा पर्याय आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल.

मुळात नवीन शिक्षण धोरणामुळे आपण काही स्वीकारलं पाहिजे. जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० आलं तेव्हा राज्यात महाविकासआघाडीचं सरकार होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अभ्यास करण्यासाठी एक समिती तयार केली. सुखदेव थोरात, माशेलकर, भालचंद्र मुणगेकर होते. या समितीने अहवाल तयार करून २०२१ साली सरकारला दिला.

उद्धव ठाकरे सरकारने हा अहवाल २०२१ साली स्वीकारला. आता हाच तो रिपोर्ट आहे, तो आम्ही स्वीकारला आहे. या अहवालात स्पष्ट सांगितलं आहे की, मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीचा करा. त्यावेळी रिपोर्ट स्वीकारताना उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजे, असं सांगितलं. आता भालचंद्र मुणगेकर, सुखदेव थोरात, माशेलकर यांना आता पण महाराष्ट्र द्रोही ठरवणार आहे का?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button