राजकारण

राज्यात ३ पक्षांचे सरकार, मिठाचा खडा टाकू नका!

अजितदादांनी संजय राऊतांना चांगलेच फटकारले

बारामती : ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादी 1999 पासून मधली 5 वर्ष वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. इतरांनी वक्तव्य केलं तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना बजावलं.

‘राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले’, असं जाहीरपणे लिखाण करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीत (MVA Government) खळबळ उडवून दिली. पण, ‘महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये’, अशा शब्दांत अजित पवार (Ajit pawar) यांनी चांगलेच फटकारून काढले आहे. बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना चांगलाच इशारा दिला.

संजय राऊत यांना चांगले माहित आहे. राष्ट्रवादीमधये शरद पवार हेच निर्णय घेत असतात. शरद पवार यांनी या राज्याचे मुखयमंत्री कोण असावे, हे काँग्रेससोबत आघाडी असताना ठरवले आहे. असं एकंदरीत वातावरणात काम करत आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, असंही अजितदादांनी राऊत यांना फटकारलं.

वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या संदर्भात विचारले असता, अजित पवार म्हणाले की, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात योग्य त्या सूचना केलेल्या असून, संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करून त्यास अटक केलेली आहे. राज्यातील कोणत्याही कार्यालयात काम करत असताना महिला व पुरुष अधिकार्‍यांचा ज्या त्या ठिकाणी योग्य मानसन्मान राखला गेला पाहिजे. यासंदर्भात राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देशमुख यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं मतही राऊतांनी व्यक्त केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button