‘शिवपुत्र संभाजी’ सिनेमाचे पोस्टर लाँच
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक अजित शिरोळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या बहुभाषिक चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच केलं. या सिनेमाच्या पोस्टरने अगदी कमी वेळात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर हे ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखले जातात आणि आता दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी हे ऐतिहासिक चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे. १३ यशस्वी मराठी सिनेमा अजित शिरोळे यांनी दिग्दर्शित केले आहेत. आनंद पिंपळकर यांचा ‘आलंय माझ्या राशीला’ हा हिट सिनेमा अजित शिरोळे यांनी दिग्दर्शित केला होता. आता अजित शिरोळे ‘शिवपुत्र संभाजी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेत.
अजित शिरोळे यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याबद्दल बोलताना अजित जी म्हणतात, शिवपुत्र संभाजी हा माझ्यासाठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. मी या सिनेमाची तयारी गेल्या १० वर्षांपासून करतो आहे. या सिनेमासाठी मी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके, बखरी आणि कादंबरी याचं वाचन केल आहे. एवढंच नाही तर या सिनेमाच्या स्पेशल इफेक्टसाठीही मी मेहनत घेतली आहे. दहा वर्षापूर्वी हॉलिवूडचा ‘300’ हा सिनेमा पाहिला आणि त्याच्या VFX नी मी भारावलो, आपल्या सिनेमातही अशीच भव्यता असायला हवी असं मी ठरवलं.
’संभाजी महाराजांच्या चरित्राने व कर्तृत्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. संभाजी महाराज थोर आणि कुशल राजे. वयाच्या केवळ १४ व्या वर्षी अनेक भाषांमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी संस्कृतमधून ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला. त्याशिवाय ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.
अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणा-या छत्रपती संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांचे खरे वारसदार असल्याचं दाखवून दिलं. स्वराज्यासाठी त्यांनी अनेक युद्ध लढली. हा इतिहास प्रत्येकाला माहिती असणं आणि देशाभिमान जागृत होणं आवश्यक आहे असं मला वाटतं, अजित शिरोळे अभिमानाने सांगत होते
शिवानी मूव्हीज आणि धनराज प्रॉडक्शनच्या संयुक्त निर्मितीतून ‘शिवपुत्र संभाजी’ हा सिनेमा भेटीला येतोय. हा सिनेमा ४ भाषेत प्रदर्शित होणार आहे. शंभरहून अधिक सिनेमांचे लेखक, तसेच राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, बाजीराव मस्तानी अशा ऐतिहासिक मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी हा सिनेमा लिहिला आहे.
लॉकडाऊन संपल्यावर दिग्दर्शक अजित सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहेत. रायगड, तुळापूर आणि संगमेश्वर अशा संभाजी महाराजांशी निगडीत रिअल लोकेशनवर शूटिंग होणार आहे. तसंच सिनेमाच्या कलाकारांची नावंही लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या अधिक माहितीसाठी आमच्यासोबत असेच राहा.