राज कुंद्रावर आरोप केल्यानंतर अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप मॉडेल-अभिनेत्री सागरिका सुमन हिने केला आहे. सागरिकाने मुंबईतील ओशिवारा पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. फोन कॉल्स, इंटरनेट आणि इतर माध्यमातून धमकी दिली जात असल्याचा दावा तिने केला आहे. राज कुंद्राने न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप करत सागरिकाने त्याच्या अटकेची मागणी केली होती.
सागरिका सोना सुमनने आपल्यालाही वाईट अनुभव आल्याचं सांगितल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला होता. या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली होती.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.