ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील नॉन कोविड वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होता तसेच त्यांचे रुटिन चेकअप करायचे असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे. यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानू यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत’ असे सायरा बानू यांनी म्हटले होते.




