Top Newsराजकारण

खासदार उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार : हर्षवर्धन पाटील

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. संभाजीराजे यांनी राज्य सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. अशावेळी खासदार उदयनराजे भोसले हे देखील मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार असल्याची माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिलीय. पाटील यांनी आज सातारा इथं उदयनराजेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

भाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत. पाटील यांनी आज सातारा इथं खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजेंच्या भेटीबाबत विचारलं असता, आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भाजप डावलत आहे का? असा सवाल पत्रकारांनी पाटील यांना विचारला. त्यावेळी संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. संभाजी राजे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सर्व राजकीय पक्ष, तसंच संघटनांना भेटत आहेत. आम्ही भाजपा म्हणून सवतासुभा मांडलेला नाही, किंबहुना त्याची गरजही नाही. हे आंदोलन राजकीय पक्षांचं नाही तर समाजाचं आहे. समाजासाठी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण कसं मिळेल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.

संभाजीराजे रायगडावरून काय घोषणा करणार?

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ते सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता ६ जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी २ जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button