राजकारण

मोदी, भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत आमदाराचा पक्षाला रामराम; मुंडन करून निषेध

कोलकाता: अलीकडेच भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले. या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजार ८३२ मतांनी पराभव झाला. यानंतर आता भाजपचे त्रिपुरा येथील आमदार आशिष दास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत आमदारकीचा राजीनामा देत असून, भाजपलाही रामराम करत असल्याचे जाहीर केले. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा गेला असून, पश्चात्ताप म्हणून कालीघाट येथे दास यांनी मुंडनही केले.

आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच विरोधकांचा मुख्य चेहरा असतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे, असे सांगत त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगितले. तसेच अपेक्षाभंग झाला म्हणून आशिष दास यांनी कोलकाता येथील कालीघाट येथे मुंडन करून घेतले. काही दिवसांपूर्वी आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसच्या कोलकाता कार्यालयात जाऊन तृणमूल नेत्यांची भेट घेतली होती, असे सांगितले जात आहे.

कालीघाट खूपच अद्भूत आणि दिव्य स्थान आहे. येथे आलेल्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते. पश्चात्ताप झाल्याने येथे मुंडन केले आहे. तसेच २०२३ मध्ये भाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. पुढील भूमिका आणि रणनीती लवकरच जाहीर करेन, असे आशिष दास यांनी म्हटले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता. गेली २५ वर्षे चाललेल्या कुशासनातून आम्हाला मुक्ती मिळेल, या अपेक्षेने भाजपला मतदान केले होते, सहकार्य केले. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडणून दिले होते. मात्र, आमच्याकडून चूक झाली, अशी टीका करत आशिष दास यांनी आमदारकी सोडत असल्याचे सांगितले.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी सांगितले की, यासंदर्भात कोणतीही टिपण्णी करणार नाही. पक्षनेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. वास्तविक आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत असल्याबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच ते तृणमूल पक्षात प्रवेश करतील, असा कयास बांधला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button