![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/02/Sanjay-Raut-2-780x405.jpg)
मुंबई : गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस, तृणमूल काँग्रेस, आपच्या पैशांचे धनी कोण? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरेच कोणी तरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण भेटले, असं म्हणत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरातून गंभीर दावे करत सवाल उपस्थित केले आहेत.
गोव्याच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून गोव्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार आहेत. या दोन पक्षांनी गोव्यात एन्ट्री घेतल्यानंतर काँग्रेससह इतर पक्षांतील नेत्यांनी पक्षाला रामराण ठोकत तृणमूल, आपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच, गोव्यातील भाजपचे आमदार आणि संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात, अशी टीका देखील राऊतांनी केली आहे.
गोव्यातली निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, पण तृणमूल काँग्रेस आणि ‘आप’सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपला मदत केली आहे. तृणमूल आणि आपसारख्या पक्षांनी गोव्याच्या मतदारांना फक्त सोन्याने मढवायचेच बाकी ठेवले. अशा आश्वासनांची खैरात उडवली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आप आणि तृणमूलचे लक्ष ख्रिश्चन मतांवर आहे. पण ख्रिश्चनांची मते काँग्रेसच्या पारड्यात पडतील. गोव्यातले राजकारण आज सोपे राहिलेले नाही. प्रत्येकाने गोव्याची राजकीय प्रयोगशाळा केली आहे. देशाच्या राजकारणाचा कसा चुथडा झाला आहे ते पाहायचे असेल तर गोव्याकडे पाहावे, असं संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात म्हटलं आहे.