
सिंधुदुर्ग : फालतू धमक्या ऐकून घेण्याची मला सवय नाही. नितेश राणेंनी बोलताना विचार करून बोलावं. त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं नाहीतर, राजकीय संघर्ष अटळ आहे. या अगोदर नारायण राणे यांच्यासोबतचा राजकीय संघर्ष मी सुरु केला नव्हता, तो राणेंनी सुरू केला. त्यामुळे नितेश राणेंनी स्वतः खाजवून खरूज काढू नये, अशा शब्दात शिवसेना नेते आ. दीपक केसरकर यांनी आ. नितेश राणे यांना इशारा दिला आहे.
भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात एका कार्यक्रमात एकमेकांची स्तुती केली. त्यानंतर सिंधुदुर्गात पुन्हा राणे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच नितेश राणे विरुद्ध दीपक केसरकर असा सामना पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख व्हायचं नसेल तर केसकरांनी विचार करुन बोलावं असा इशारा नितेश राणे यांनी दिला. नितेश राणे यांनी केसरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. सावंतवाडीत खेळणी घोटाळा, गोव्यात केसरकरांनी विकत घेतलेल्या जमिनीची माहिती घेऊन ईडीकडे तपासाची मागणी करणार आहे. केसरकरांना दुसरा अनिल देशमुख बनायचं नसेल तर त्यांनी विचार करून बोलावं असा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे.
दीपक केसरकरांनीही नितेश राणेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. सावंतवाडी संस्थानची परंपरा आहे ती आम्ही कुणाला चिडवत नाही. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. परंतु कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांनी जे बोलले ते तपासून पहावं व शब्द मागे घ्यावेत हा वाद इथेच मिटेल, असं प्रत्युत्तर केसरकर यांनी दिलं आहे.




