Top Newsराजकारण

शरद पवारांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत परिवहन मंत्र्यांची चर्चा; ठोस निर्णय नाहीच !

एसटी संपावर तुर्तास न्यायालयीन तोडगा नाहीच; २० डिसेंबरला होणार सुनावणी

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अनेक प्रयत्न करुनही या संपावत तोडगा निघत नव्हता. त्यानंतर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागला. आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण, या बैठकीतही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. अनिल परब म्हणाले, गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे अनेकांचे हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर काय मार्ग निघू शकतात, त्यावर चर्चा केली. तसेच, एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रुळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजनांसह इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली, अशी माहिती परबांनी दिली.

परब पुढे म्हणाले, आजच्या बैठकीत वेतन वाढीसंदर्भातही चर्चा झाली, येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईलच. त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर या विषयावर चर्चा होईल. आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती आम्ही त्यांना दिली. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांवरही चर्चा आज केली. राहिला विषय एसटीच्या विलीनीकरणाचा, तर तो मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार, अशीही माहिती परब यांनी दिली.

आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?; पडळकरांनी सुनावले

मुंबईतील आझाद मैदानावर हजारो एसटी कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणीही या आंदोलकांशी चर्चा करायला आलेले नाहीत. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता भाजप आमदार गोपींचद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला असून, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का, अशी विचारणा केली आहे. अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का, असा थेट सवालही केला.

ठाकरे सरकारचे वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचे धोरण आहे. अनिल परब यांच्या वक्तव्यात काहीच बदल नाही. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथे यावे आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावे. हे काय कुठले अतिरेकी इथे येऊन बसले आहेत का, त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

एसटी संपावर तुर्तास न्यायालयीन तोडगा नाहीच; २० डिसेंबरला होणार सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तुर्तास न्यायालयीन तोडगा निघणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी संपाविरोधातील पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार असून पुढील सुनावणीपर्यंत कामगार संघटनांनी चर्चा करुन समितीनं सकारात्मक तोडगा काढावा, असे आदेश दिले आहेत. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आज सुनावणी पार पडली.

या सुनावणीत उच्च न्यायालयाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुनावलं. कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता सुरू होतायत, खेडेगावातील विद्यार्थ्यांनी काय करायचं? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे, याचाही विचार करावा असंही न्यायालयाने सुनावलं. तसंच, एसटी संपाचा ग्रामीण भागावर खूप मोठा परिणाम झाला असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.

दरम्यान आजच्या सुनावणीत सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. प्रत्येक संपकरी संघटना स्वतंत्रपणे समितीसमोर आपली बाजू मांडणार आहेत,” असं राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. तसंच, संपकाळात कामावर येऊ इच्छिणाऱ्या कामगारांना संपकऱ्यांनी आडकाठी केली. अशी महामंडळाने तक्रारही उच्च न्यायालयाकडे केली. मात्र अशी घटना घडल्याचं संपकरी कामगार संघटनेनं नाकारलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button