पीडी वीज बिल थकबाकीदारांनी ३१ डिसेंबरपूर्वी मुदतीचा फायदा घेण्याचे टोरंटतर्फे आवाहन

ठाणे : कळवा, मुंब्रा, दिवा येथील कायमस्वरूपी ज्यांचे वीज मीटर बंद झाले आहेत ( पीडी मिटर) त्यांच्यासाठी दिलेल्या हप्ताने बिल थकबाकी मुदतवाढीची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपत आहे. त्या आधी ग्राहकानी टोरंट पॉवर कंपनीशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कंपनीतर्फे ग्राहकांना करण्यात आले आहे. यासाठी टोरंट पॉवर कंपनीने शीळ-कळवा- मुंब्राच्या काही भागात बॅनर लावले असून ग्राहकांसाठी एक माहिती पुस्तिकेचे देखील वाटप सुरू केले आहे. याबरोबर ग्राहकाना त्यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे देखील कल्पना देण्यात येत आहे.
महावितरणच्या काळात वीज बिलातील त्रुटीमुळे किंवा बिलाची थकबाकी न भरल्याने अनेकांचे मीटर कायमस्वरूपी बंद ( पीडी) झाले आहेत. अशा शेकडो ग्राहकाना जुनी थकबाकी भरून नवीन अधिकृत मीटर घेता येणार आहे. महावितरणने १ मार्च २०२० पासून टोरंट पॉवर कंपनीकडे कळवा-मुंब्रा-दिवा विभागाचा कारभार सोपवला. मात्र वीज बिल न भरल्याने काहींचे मीटर कायमस्वरूपी बंद झाले आहेत. मुंब्रा-दिवा परिसरात अशा ग्राहकांची संख्या काही हजारांच्या घरात आहे.

कळवा, मुंब्रा , दिवा परिसरातील कायमस्वरूपी मीटर डिस्कनेट ( पीडी) झाले असतील तर, त्यांच्यासाठी महावितरणने व्याज माफी व हप्तावर भरणा करण्याची संधी जानेवारी २०२१ पासून उपलब्ध करून दिली होती. ग्राहकांच्या मागणीनुसार जूननंतर या योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन आता ३१ डिसेंबर २०२१ ची अंतिम तारीख देण्यात आली आहे. टोरंट कंपनीने आता पुन्हा एकदा जोरदार प्रचार मोहिम राबवून ग्राहकानी या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. कारण या योजनेत ग्राहकाला थकबाकीवरील व्याज माफ होणार असून पैसे हप्त्याने देखील भरता येणार आहे. ग्राहकानी सदर योजनेच्या माहितीसाठी टोरंट कंपनीच्या ग्राहक कक्षाशी संपर्क साधावा असे कंपनीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
अशी आहे ही योजना…
– ज्या ग्राहकांचे मीटर बिल भरणा न केल्याने कायम स्वरूपी बंद झाले असतील त्याना दोन पर्याय आहेत.
– पहिला पर्याय म्हणजे मूळ थकबाकीच्या ११० टक्के किंवा वास्तविक थकबाकी जे काही कमी असेल त्याचे पेमेंट करून टाकायचे.
– दुसरा पर्याय म्हणजे देय रकमेच्या ३० टक्के डाऊन पेमेंट करून राहिलेली थकबाकी भरण्यासाठी ग्राहकाला ३१ मार्च २०२२ पर्यंत दर महिन्याला हप्त्याने पैसे भरता येतील.
– जे ग्राहक सर्व मुद्दल भरायला तयार असतील त्या ग्राहकाला जी काही मुद्दल असेल त्यावर फक्त १० टक्केच ज्यादा भरायचे आहे. तर व्याज माफीचा फायदा त्याला घेता येईल.
– ही हप्ता योजना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच आहे, त्यामुळे जवळच्या टोरंट ग्राहक कक्षाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेता येईल.
– ज्यावेळी ग्राहक त्याची थकबाकीची रक्कम भरेल किंवा त्याच्या ३० टक्के एवढी रक्कम भरेल त्यानंतर त्याला नवीन मीटरसाठी अर्ज करता येईल.




