टोक्यो ऑलिम्पिक : हॉकीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव
टोक्यो : जागतिक हॉकी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं ८-० अशा फरकानं टीम इंडियाला घरच्या मैदानावर लोळवले होते आणि आजचा पराभव हा त्या सामन्याची आठवण करून देणारा ठरला. आक्रमकता, बचाव, ताळमेळ, चेंडूवरील नियंत्रण या सर्वच आघाड्यांवर ऑस्ट्रेलियन खेळाडू सरस ठरले. ऑलिम्पिक इतिहासाचा विचार केल्यास १९७६ साली ऑस्ट्रेलियानं भारतीय संघावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला.
अ गटातील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ असा संघर्षमयी विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची आज खऱ्या अर्थानं कसोटी लागेल हे निश्चित होतं आणि तसे झालेही. सामन्याच्या १० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर डॅनिएल जेम्सनं गोल करून ऑसींना आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रातील १-० अशा आघाडीनंतर टर्फवर उतरलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बचाव भेदण्यात भारतीय खेळाडूंना सातत्यानं अपयश येताना दिसले. ऑसींनी २१ ते २६ अशा पाच मिनिटांत आणखी तीन गोल केले आणि मध्यंतरापर्यंत ४-० अशी मोठी आघाडी घेतली. २१ व्या मिनिटाला जेरेमी हेवर्ड्स व २३ व्या मिनिटाला फ्लिन ओगिलव्हीइ यांनी गोल केले. त्यात २६ व्या मिनिटाला जोशूआ बेल्ट्ज यानं गोल केला.
दुसऱ्या हाफमध्ये भारताकडून आक्रमक खेळ झाला. पण, त्याचे गोलमध्ये रुपातंर करण्यात त्यांना सातत्यानं अपयश येताना दिसले. ३२ व्या मिनिटाला ग्रीन कार्ड मिळाल्यामुळे तीन मिनिटांसाठी मैदानाबाहेर बसलेल्या दिलप्रीत सिंगनं भारताचे खाते उघडले. ३४ व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल झाला. त्यानंतर ऑसींकडून आणखी जोरदार खेळ झालेला पाहायला मिळाला. ४० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर ब्लॅक गोव्हर्सनं गोलं केला. त्यानंतर 42व्या मिनिटाला गोव्हर्सनं कॉर्नरवर गोल केला आणि चौथ्या सत्रात टीम ब्रँड ( ५१) च्या गोलनं ऑस्ट्रेलियाची आघाडी ७-१ अशी मजबूत केली.