मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना अजून बाल्यावस्थेत आहे, अशी टीका राणे यांनी केली. याशिवाय, ‘सामना’तून सुरु असलेल्या टीकेला १७ सप्टेंबरनंतर ‘प्रहार’मधून उत्तर देईन असं देखील राणे म्हणाले. दरम्यान, राणे यांनी ‘सामना’वर बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं. सध्या कायदेशीर सल्ला घेतोय, असं त्यांनी सांगितलं.
नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. काही ठिकाणी तुमचे पोस्टर फाडण्यात आले, असा प्रश्न करण्यात आला. यावर उत्तर देताना राणे यांनी हा बालिशपणा आहे, असं म्हटलं. मी कार्यकर्त्यांना सांगेन की पोस्टर फाडू नका. हे लहान मुलांचे खेळ आहेत. शिवसेना अजून बाल्यावस्थेत आहे, बाहेर आली नाही आहे. त्यामुळे अशी हरकत करतायत, असं राणे म्हणाले.
गेले दोन दिवस ‘सामना’च्या संपादकीयमधून राणेंवर निशाणा साधला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी १७ सप्टेंबरनंतर प्रहारमधून टार्गेट करेन असा इशारा राणे यांनी दिला. १७ तारखेनंतर मी प्रहारमधून टार्गेट करणार. ते कुठे जाणार. कोर्टात केस आहे. त्यानंतर करणार. कशी भाषा बोलायची ना ते मी त्यांना शिकवेन. काय दर्जाचा पत्रकार? कुठे कामाला होते? काय भाषा बोलतात? ठिकेय, थोडे दिवस, असा इशारा राणे यांनी दिला.