
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवरील हल्लाबोल सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी दिवाळीनंतर फटाके फोडणार, तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे उघड करण्याचा इशारा किरीट सोमय्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला होता. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे उद्यापासून दोन दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भांत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.
मी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग, सीबीडीटी, ईडी, सहकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. १० नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल करणार आहे. पुढील काही आठवड्यांत ज्या ३ मंत्र्यांचे घोटाळे काढणार त्या पैकी हा पहिला खुलासा असे म्हणत त्यांनी पुढे ‘अॅक्शन’, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारमधील ३ मंत्र्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या निशाण्यावरचे ३ मंत्री नेमके कोण आहेत, याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ट्विट केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चिंता वाढवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच या सर्व मंत्र्यांविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली. आता पुन्हा ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे घोटाळे उघड करण्यासाठी सोमय्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.