अर्थ-उद्योगमहिला

‘टाइम्स ग्रुप’च्या चेअरपर्सन इंदू जैन यांचे निधन

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या माध्यम संस्थांपैकी एक असलेल्या ‘टाइम्स ग्रुप’च्या चेअरपर्सन इंदू जैन यांचे दिल्लीत गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मीडिया संस्था आणि कामाप्रती असलेल्या असीम निष्ठेमुळेच इंदू जैन अनेक महिलांसाठी आदर्शवत होत्या. भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. कला आणि संस्कृतीमध्ये विशेष रस असलेल्या इंदू जैन भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष देखील होत्या. याशिवाय त्यांनी महिलांच्या अधिकारांबाबतही आवाज बुलंद केला होता.

मूळच्या उत्तर प्रदेशातील फैजाबादमधील असलेल्या इंदू जैन यांचा विवाह ‘टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप’च्या अशोक कुमार जैन यांच्याशी झाला होता. १९९९ मध्ये अशोक जैन यांचं निधन झालं होतं. बी.सी.सी.एल.चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विनित जैन आणि समीर जैन हे दोघे इंदू जैन यांची मुले आहेत. देशातील सर्वात मोठ्या उद्योजक घराण्यांपैकी एक असलेल्या कुटुंबाचा पाया म्हणून मजबुतीने उभ्या राहिलेल्या इंदू जैन ‘टाइम्स फाऊंडेशन’च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी या फाऊंडेशनची स्थापना २००० मध्ये केली होती. ही फाऊंडेशन आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या मदतीसाठी धावते. या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात इंदू जैन यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. अनेकदा फोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या इंदू जैन या FICCI महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष देखील होत्या.

इंदू जैन यांनी वाढत्या वयाची चिंता न करता कायम कामाला महत्त्व दिलं. त्या देशातील यशस्वी बिझनेसवुमन होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू जैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. समाजासाठी दिलेल्या योगदानासाठी इंदू जैन कायम स्मरणात राहतील, असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button