शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांत नाही : राकेश टिकैत

नवी दिल्ली : ट्रॅक्टर हे बॅरिकेट तोडण्यासाठीच असतात. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची पोलिसांमध्ये हिंमत नाही, असा दावा करत शेतकऱ्यांची लढाई सरकारशी नसून, देश लुटणाऱ्यांविरोधात आहे. ते भुकेचा व्यापार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीतील सीमांवर आंदोलन करीत आहेत. अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे समर्थन या आंदोलनाला मिळावे, यासाठी टिकैत विविध राज्यांतील किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांची लढाई सरकारशी नसून, देशाला लुटणाऱ्यांविरोधात आहे, असा दावा त्यांनी केला. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी नाहीत, त्यांच्यासाठी देखील ही लढाई आहे. दिल्लीला चारही बाजूंनी शेतकऱ्यांचा वेढा आहे. मात्र, तरीही याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही, असे टिकैत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी पीके महत्त्वाची आहेत. आता पीके काढून घ्या. एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलनासाठी दिल्लीला यायचे आहे. ट्रॅक्टरमध्ये मुबलक प्रमाणात डिझेल भरून ठेवा. जेव्हा सांगितले जाईल, तेव्हा दिल्लीकडे कूच करा. आपल्या जमिनी वाचवायच्या असतील, तर आंदोलनात सक्रीय सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वधारत आहेत. मात्र, सरकार यासंदर्भात काहीही करत नाही. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जात नाही. भांडवलदार छोट्या दुकानदारांच्या पोटावर पाय आणण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत बड्या कंपन्यांची स्पर्धा करावी लागेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची सबसिडी सोडण्याचे आवाहन केले जाते. तसेच खासदार आणि आमदारांना पेन्शन सोडण्याचे आवाहन सरकार का करत नाही, असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे.