मुक्तपीठ

‘रोखठोक’ उत्तर

- मुकुंद परदेशी

प्रति,
देवानाना नागपूरकर यांसी,

तुम्ही आमच्या मालकांना गिचिडमीचीड अक्षरात लिहिलेली चिट्ठी त्यांना वाचता न आल्यामुळे, पक्षी त्यांना तितका वेळ नसल्यामुळे त्यांनी ती माझ्याकडे पाठवून दिली. सोबतच काही उत्तर देण्यालायक असल्यास बघावे अन्यथा केराची टोपली दाखवावी, असा निरोपही धाडला. अत्यंत गिचिडमीचीड अक्षरातली ती चिट्ठी शेवटी एका केमिस्टकडून वाचून घेतली.

आमच्या मालकांनी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही हुरळून गेलात. एक लक्षात घ्या, आपला लॉकडाऊनचा इरादा कानी घालण्यासाठी त्यांनी वीस पंचवीस जणांना फोन केले. त्यातले एक तुम्ही. त्यामुळे फार हुरळून जाण्याचं कारण नाही.गरजेपोटी काही गोष्टी इच्छा नसतांनाही कराव्या लागतात. त्या त्यांनी केल्या. कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा सांगतो. आमच्या कॉलेजच्या ब्युटी क्वीनवर तिच्याच वर्गातला एक ढेरपोट्या मरायचा. ती अर्थातच त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नसे.एकदा तिच्या सायकलची चेन उतरली. तिने ढेरपोट्याला चेन लावून देता का प्लिज म्हणून विनंती केली. ढेरपोट्या पाघळला. त्याने हात काळे करून घेतले. काम झाल्यावर ती त्यांच्याकडे न बघता सायकलवर बसून निघून गेली. अर्थ लक्षात घ्या. कधीकाळी तुम्ही राजकारणातले सुपरस्टार असालही , पण काळाची पावलं ओळखता न आल्यामुळे आता तुमचा ‘ राजेश खन्ना’ झाला आहे.आता तुम्ही मनोमन का होईना , खातेवाटप करणे म्हणजे ‘ मुंगेरीलाल के हसीन सपने !’ तुमच्या सौ. तुमच्यापेक्षा जास्त हुशार असल्याचं वाचून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. मेंटली रिटार्ड माणसाचा केअर टेकर त्याच्यापेक्षा जास्त हुशार असणारच . ती काय चिट्ठीत लिहिण्याची गोष्ट आहे ?

आता थोडा महत्त्वाचा मुद्दा घेतो. दीड वर्षांपूर्वी आमच्या मालकांनी तुमच्याशी चिटिंग केलं हे साफ खोटं आहे. तुम्हीच गेली पंचवीस वर्षे आम्हाला सडवलंत. तुम्हाला वेळीच ओळखलं असतं तर एव्हाना आमचे मालक देशाचे पंतप्रधान झाले असते. होतीलच ते एक दिवस. बघालच तुम्ही. दीड वर्षापूर्वी तुम्ही ज्याला गांडूळ समजत होता ,प्रत्यक्षात तो नाग निघाला ! त्याने मारलेला डंख , त्याचं विष उतरवायला तुमचे ते दोन दाढीवाले भगतसुद्धा कमी पडलेत . ही वस्तुस्थिती आहे आणि आता ती महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवली गेली आहे.

आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो. त्या पंचतारांकित हॉटेलमधल्या जेवणाचा उल्लेख चिट्ठीत करण्याची काय गरज होती ? मी तर तुम्हाला आपण ‘कॅफे मद्रास’मध्ये बसून मसाला डोसा खात खात चर्चा करू असंच सुचवलं होतं . अंथरूण पाहून पाय पसरावे आणि पगार पाहून हॉटेल निवडावे हे आम्हाला चांगलंच कळतं. एकदा आमच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात येऊन बघा, दोघांमध्ये एक ‘कटिंग’ मागवतो आम्ही ! तुम्हीच पंचतारांकित हॉटेलचा आग्रह धरला. राहिला प्रश्न तुमच्या ‘मॅरेथॉन मुलाखती’चा, तर आता तुम्ही आमचा ‘ करेक्ट गेम’ करणार आहात अशा बातम्या वाचतोय, ऐकतोय. म्हटलं एकदा होऊनच जाऊ द्यावा ‘ करेक्ट गेम’ . मग तुमच्या शपथविधी नंतरच तुमची मुलाखत घ्यावी. मग ती ‘मॅरेथॉन’ ऐवजी ‘ महामॅरेथॉन’ झाली तरी चालेल. आणि हो मला अजिबात घाई नाही. पुनर्जन्मावर विश्वास आहे माझा .
– सामनावीर संपादक

ता.क. – त्यादिवशीचं पंचतारांकित हॉटेलमधलं जेवण अळणी नव्हतं . मीठ होतं त्यात. खाल्ल्या मिठाला जागण्याची संस्कृती आहे आमची, म्हणून तुमच्या त्या फालतू चिट्ठीला उत्तर देतोय . न पेक्षा ती केराच्या टोपलीत फेकण्याच्याच लायकीची होती. उलट ती केराच्या टोपलीत फेकली असती तर तो त्या केराच्या टोपलीचा अपमान झाला असता . तुमच्या सौ.ना ट्विट करून कितीही शेरोशायरी करू द्या. माझ्याकडेही शेरोशायरीची रद्दीतून आणलेली भरपूर पुस्तकं आहेत. तुम्ही दोघंही एकदा शांतपणे बसून ते राजेश खन्नाचं, ‘ जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम , वो फिर नही आते.’ जरा ऐकाच . थोडी समज वाढेल.

विशेष विनंती – तो माझ्या पगरवाढीचा मुद्दा बरोबर मांडला होता. जरा आमच्या मालकांना परत एकदा आठवण द्या ना. ‘महामॅरेथॉन मुलाखती’चं लवकरच बघतो.

– सा. सं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button