
संपूर्ण भारत ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ उभी केली अशा प्रा. श्याम मानव यांना जे असंख्य प्रश्न विचारले जातात त्यात एक प्रश्न कॉमन असतो.तुम्ही मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धा, कुप्रथा यांच्यावर का बोलत नाही. अर्थात मानव त्याला समर्पक उत्तरे देतात पण प्रश्नकर्ता समाधानी होत नाही याचे एकमेव कारण असते या चळवळीत मुस्लिमांचा अभाव. शिकलेले मुस्लिम आपल्या धर्माची चिकित्सा तर सोडा, किरकोळ वाईट प्रथांवर सुद्धा बोलत नाहीत. जे बोटांवर मोजण्याएवढे मुस्लिम या चळवळीत काम करतात त्यांना मुस्लिम भाव देत नाहीत, त्यांचे काहीच ऐकले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.
विज्ञानाच्या कोणत्याही ज्ञान शाखेला आजच्या घडीला मुस्लिम मान्यता देत नाहीत, जे मान्यता देतात ते सगळे काही अल्लाहने निर्माण केल्याचे मानतात. मुल्ला, मौलवी, हाफिज चर्चेत सहभागी होत नाहीत, जे होतात त्यांच्या उत्तरात कोणताही तर्क आढळत नाही. अशा काळात मुस्लिम तरुणांच्या तर्काला चालना मिळत असेल तर हा या शतकातील आनंददायी बदल म्हणायला हवा. जगभरातील शिक्षित मुस्लिम कुटुंबातील नवी पिढी इंग्रजी शिक्षण घेऊन सर्व धर्मीय मित्र, मैत्रिणींच्या संपर्कात येत आपल्या मेंदूतील ज्ञान कक्षा स्वतःच रुंदावत आहेत. जगात घडणार्या कोणत्याही घटनेला कारण असते, विनाकारण काहीच घडत नाही हे ज्याच्या मेंदूत शिरले त्याचा तर्क जागा होतो. आता तो मुस्लिम तरुण, तरुणींचा जागा होत आहे ही आनंदाची बाब आहे.
भारतात जी एक्स मुस्लिम मूव्हमेंट उभी राहतेय, त्यात मोठ्या प्रमाणावर मुली असल्याचे लक्षात येते. युट्यूबवर जफर हेरिटेक नावाने एक एक्स मुस्लिम तरुण चॅनल चालवतो, त्याचे तर्क, मुलाखती, मांडणी आणि त्याची तळमळ खरोखर समजून घेण्यासारखी आहे. सगळ्याच धर्मात स्त्रियांना खूप काही भोगावे लागत आहे. त्या तुलनेत मुस्लिम स्त्रिया किती भयंकर भोगत असतात याचे अनुभव या प्रकारच्या सगळ्या चॅनेल्सवर ऐकवले जात असतात. मेंदूतील तर्काचा वापर आणि इतर साहित्याचे वाचन केल्यावर आपल्याला जे बालपणापासून सांगितले गेलेय त्याची चिकित्सा केल्याशिवाय कोणतेही ज्ञान तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. याचा अनुभव या सगळ्या एक्स मुस्लिम व्यक्तींकडून ऐकला जाऊ शकतो.
एक्स मुस्लिम मूव्हमेंटमधील ९९ टक्के व्यक्तींना आज स्वतःची ओळख लपवून व्यक्त व्हावे लागते हे अतिशय गंभीर आहे. त्यांची ओळख पटली तर जीवाचे काही खरे नाही ही भीती त्यामागे आहेच. यातील सगळ्याच व्यक्ती नास्तिक झालेल्या नाहीत. एक्स मुस्लिम मूव्हमेंटमधील किमान ६० टक्के लोकांचा प्रवास नास्तिकतेकडे असल्याचे त्यांच्या चर्चेतून जाणवते. ४० टक्के व्यक्ती अशा आहेत की ज्या नास्तिक बनल्या नाहीत, मात्र जो कोणी सुपर पॉवर असेल तो कुणाही बाबत निर्दयी, द्वेषी होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. ते अजूनही हे विश्व कुठल्यातरी शक्तीने निर्माण केले आहे, म्हणजे कुणीतरी क्रियेटर असला पाहिजे असे मानतात. यापैकी दहा टक्के व्यक्तींचा ओढा हिंदू धर्माकडे दिसतो. कट्टर प्रवाह कोणतेही असो, त्यापासून स्वतःला विलग करीत नव्या विवेकवादी विचारांचा ज्यांनी स्वीकार केला त्या सर्वांचे विचार आणि व्हिजन ऐकले की हेच विचार उद्याचा मजबूत भारत घडविण्यास मदत करतील याची खात्री पटते. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या टीनजर मुस्लिम मुली जे मानवतावादी चिंतन मांडतात ते ऐकून अभिमान वाटतो. मुस्लिम धर्मात विवेक उदयास येणारच नाही हा समज एक्स मुस्लिम चळवळीने मोडीत काढून नव्या प्रवाहाला प्रारंभ केला आहे. दररोज शेकडो मुस्लिम त्याला जुळत आहेत हे असेच परिवर्तन सुरू राहिले तर कदाचित पाच वर्षांनी एक्स मुस्लिम खुलेपणे आपला मेळावा घेऊ शकतील, हे वातावरण देशात निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू या.




