राजकारण

वाघ ठरवतो मैत्री कुणाशी करायची : संजय राऊत

चंद्रकांत पाटलांना वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा

नाशिक : वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी हटके उत्तर दिले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते. राऊत यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

एकमेकांचं लक्ष असतं विधानसभेवर. आम्हालाही वाटतं की आमचा आकडा विधानसभेवर १०० पार जावा. त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. ते गरजेच आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button