मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज आणखी तीन गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केला. दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे. एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं. त्या मुलाच्या कुटुंबीयाने बेल अॅप्लिकेशन केली. त्यात एनसीबीचा कोणताही अधिकारी घरी आला नाही. त्या मुलाला घरातून बोलावण्यात आलं. खोटा गुन्हा तयार करून त्याला अटक केली गेली. ज्या मुलाला फसवलं त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहे. शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून त्याला अटक केली, असं मलिक म्हणाले.
Youth says NCB’s Sameer Wankhede ‘planted’ contraband, seeks bail in drugs case https://t.co/A5Uoeu4MtZ via @timesofindia
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
पत्नीच्या चुलत भावालाही अडकवलं
वानखेडे यांनी ज्या मुलीला घटस्फोट दिला ती मुलगी कधीही विरोधात जाईल म्हणून तिच्या एका चुलत भावाला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं. एका ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून त्याच्या घरात ड्रग्ज ठेवलं गेलं आणि या महिलेच्या चुलत भावाला अटक केली. मुलीच्या घरच्यांना घाबरवलं. आमच्या विरोधात बोलला तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज प्रकरणात अटक करू अशी धमकी देण्यात आली. मात्र वानखेडेंचा सर्व फर्जीवाडा बाहेर येत आहे, असं त्यांनी सांगितलं.
वानखेडेंची नोकरी जाणारच
समीर वानखेडे हे खोट्या नोटांचे खिलाडी आहेत. त्यांना बनावट सर्टिफिकेट बनवणं कितीसं अवघड आहे. ते फर्जीवाडा आणि बनावट नोटात मास्टर आहेत. त्यांनी जन्माचं बर्थसर्टिफिकेट दाखवावं. खोटी कागदपत्रं दाखवू नका. त्यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे. तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे. त्यांनी 1993मध्ये खाडाखोड करून कागदपत्रं मिळवली. रजिस्टर गहाळ केलं. पण हे सर्व कागदपत्रं स्कॅन आहेत. खोट्या कागदपत्रांवरच त्यांनी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं.
अनिल बोंडे खोटे बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप
Listen to this BJP MLA from Amravati
झूठ बोले कौआ काटे… pic.twitter.com/7ch15MREqz— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
नवाब मलिक यांनी अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून घणाघाती हल्ला केला आहे. ट्विटरवर त्यांनी अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप मलिक यांनी टाकली आहे. अमरावतीत उसळलेल्या दंगल प्रकरणी भाजप नेत्यांनी पैसा पुरवून हिंसक कारवाया घडवून आणल्या, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तर महाविकास आघाडीनेच या दंगलींना पैसा पुरवल्याचा आरोप अनिल बोंडे आणि इतर भाजप नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हे ट्विट केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये अनिल बोंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप समाविष्ट आहे. यात अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, ते पहा, असं मलिक यांनी म्हटलं. ऑडिओ क्लिपमधील मजकूर असा- ” गोंध्रा दंगलीनंतर गुजरात किंवा अहमदाबादमध्ये दंगल झालीच नाही. त्याआधी अहमदाबादमध्ये दरवर्षी दंगल ठरलेली असायची. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असे कृत्य झाले नाही. राज्यात फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हाही दंगल झाली नाही. भाजपचं सरकार जिथं असतं, तिथे दंगल घडवण्याची हिंमत कुणीही करत नाही. पण ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं, त्या ठिकाणी दंगली होतात. कारण अशा हिंसक कारवाया करणाऱ्यांना नेत्यांकडून संरक्षण मिळलं. याआधीच्या पाच वर्षांच्या सरकारमध्ये कोणत्याही संवेदनशील भागात दंगे झाले नाहीत. ” ही ऑडिओ क्लिप अनिल बोंडे यांची असून त्यांनी किती खोटं बोललंय, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
अमरावती दंगल प्रकरणी भाजप नेत्यांना अटक
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमरावती पोलिसांनी शहरात घडलेल्या दंगल प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक केली. यात माजी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. काल १७ नोव्हेंबर रोजी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र हिंमत असेल तर ज्यांच्या घरात खरोखरच्या तलवारी आहेत, त्यांना अटक करून दाखवा, असं आवाहान अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिलं होतं.