
मुंबई : ‘सत्य परेशान हो सकता है…लेकिन पराजीत नहीं’, असं म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्व आरोपातून दोषमुक्त झाल्यावर विरोधकांना प्रत्त्युतर दिलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालयानं आज छगन भुजबळ यांची कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. भुजबळांचं नाव आता या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. भुजबळांनी आरोपातून दोष मुक्त झाल्याच्या कोर्टाच्या निकालावर आनंद व्यक्त केला आणि न्यायदेवतेचा आभारी असल्याचं म्हटलं.
सत्य परेशान हो सकता है…लेकीन पराजीत नहीं…असं म्हणतात त्याची प्रचिती आज आली आहे. तुम्ही जर खरे असाल तर कधीना कधी विजय तुमचाच होतो आणि कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माझं काहीच नव्हतं. ते आम्ही कोर्टासमोर पुराव्यानिशी मांडू शकलो आणि न्यायदेवतेनं आमचं म्हणणं ऐकून घेत योग्य निर्णय दिला. या सगळ्या प्रकरणानंतर आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही…. कोणावरही लोभ नाही, असंही ते म्हणाले.
काही लोकांनी आम्हाला त्रास द्यायचं ठरवलं आहे. पण तुमची बाजू सत्याची असेल तर घाबरण्याचं काही कारण नसतं. त्यामुळे आज राज्यात अनेकांविरोधात कारवाया सुरू आहेत. पण तेही न्यायानं लढा देऊन यातून मुक्त होतील, असं भुजबळ म्हणाले. आज कोर्टानं दिलेला निकाल तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर आहे, असंही ते म्हणाले.
कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळाला नाही… आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले… यासगळ्या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. पण गणेशोत्सच्याआधी आमच्यावरचं संकट दूर झालं, असं भुजबळ म्हणाले.
साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के…
साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…. ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…. अशी शेरेबाजी करत भुजबळांचा पुन्हा एकदा शायराना अंदाज दिसून आला. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे… त्यांनी कितीही कटकारस्थान केलं तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरचं विघ्न दूर झालं… पवारसाहेबांचे आभार…. जयंतराव-अजितदादांचे आभार… मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार भुजबळ यांनी मानले.
ताबडतोब पवारसाहेबांना भेटलो, आता शांत झोपणार
कोर्टाच्या निर्णयानंतर ताबडतोब पवारांना सांगणं अपेक्षित होतं, मुख्यमंत्री हे माझ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, त्यांनीही आनंद व्यक्त केला. आज समाधानाची बाब आहे, पण काही लोक मला झोपू देणार नाहीत हे मला माहिती आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी मी शांत झोपणार आहे, असंही ते म्हणाले.
तुरुंगात जावं लागल्याचं दुख आहे पण…
तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं… दरम्यानच्या काळात मला, माझ्या कुटुंबाला, छोट्या लेकरांना खूप त्रास झाला पण आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे… कशाचा कुणाचा द्वेष करायचा…. म्हणून माझ्या मनात कुणाबद्द्ही द्वेष नाही… राग नाही, असंही भुजबळ म्हणाले.
आमचं सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली… माझा न्यायदेवतेवर विश्वास होता… अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला… माझ्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे, असं भुजबळ म्हणाले.




