मीरा-भाईंदरमधील ‘यूएलसी’ घोटाळ्यात तिघांना अटक
ठाणे : मीरा-भाईंदर शहरातील गाजलेल्या यूएलसी घोटाळ्याचा पाच वर्षानंतर पुन्हा तपास सुरू करत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणात तीनजणांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेले महापालिकेचे साहाय्यक संचालक आणि नगररचनाकार दिलीप घेवारे हे फरार झाले आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त साहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे (५४), कनिष्ठ आरेखक भरत कांबळे (५६) आणि वास्तुविशारद मदतनीस शेखर लिमये (५५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मीरा-भाईंदर शहरात २०१६ मध्ये सुमारे १०२ कोटींचा यूएलसी घोटाळा झाला होता. मीरा-भाईंदर शहराच्या विकास आरखड्यानुसार जमीन रहिवास क्षेत्रात असतानाही ती हरित क्षेत्रात दाखवून काही विकासकांनी यूएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळविली होती. त्याआधारे त्यांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस या गुन्ह्यात पाचजणांना अटक झाली होती. परंतु या गुन्ह्याचा तपास अचानकपणे थंडावला होता. या घोटाळ्याची फाईल ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पाच वर्षानंतर पुन्हा उघडून तपास सुरू केला आहे.