मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची ‘ई-मेल’द्वारे धमकी
मुंबई : मंत्रालयात अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब ठेवल्याचा धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मंत्रालय परिसरात तत्काळ बॉम्ब शोधक पथक झाले असून कसून तपास सुरु आहे. सध्या मंत्रालय परिसरातील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. दरम्यानमंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा धमकी देणारी ही पंधरा दिवसातली दुसरी घटना आहे.
मंत्रालय सुरक्षा विभागाला आज सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास हा धमकीचा मेल आला होता. त्यानंतर बॉम्ब नाशक आणि शोधक पथक मंत्रालय परिसरात पोहचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रालय परिसराचा कसून तपास सुरु केला. मात्र हा मेल फसवा असल्याचे उघड झाल्याने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मेल करणाऱ्या आरोपीला काही वेळातच ताब्यात घेतले आहे.
पुण्यात घोरपडीमधून या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश शिंदे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी संध्याकाळी शैलेशनं हा मेल केला होता. मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं त्यानं गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे.
राज्य शासनाने प्रमुख केंद्र म्हणून मंत्रालयात यापूर्वी ३० मे रोजी बॉम्ब ठेवल्याचा फेक मेल आला होती. या मेलमुळे काही वेळ मंत्रालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. मात्र तपासाअंती हा फोन बनावट आणि अफवा असल्याचे समोर आले. याप्रकरणी नागपूरमधील सागर मंदेरे या मनोरुग्ण तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.