ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकायला निघाले; त्यांनी एसटीवर बोलू नये : बाळासाहेब थोरात
अहमदनगर: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला असून, एअर इंडिया विकली आहे. रेल्वे विकायला निघाले आहेत, त्यांनी एसटीवर बोलू नये, अशी टीका केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कामगारांच्या हिताची आम्ही जपणूक करत आहोत. या संपातून तोडगा काढण्याचा परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे परिवहन मंत्री या प्रश्नात लक्ष घालत असून, त्यावर काही ना काही मार्ग निघेलच, असा विश्वास थोरात यांनी बोलताना व्यक्त केला.
काही लोक एसटीचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे उघड आहे. ते सर्वांनाच दिसत आहे. ज्यांनी एअर इंडिया विकली. रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही, असा हल्लाबोल थोरात यांनी केला. तसेच ठरावीक लोकांसाठी कृषी कायदे तयार करण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या सरकारने जनतेच्या विरोधात सातत्याने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नागरिकांना वेठीस धरले. कोरोनाच्या काळात मदत करायची सोडून टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितले गेले. आता हे टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे आहेत, अशी विचारणा थोरातांनी केली.
दरम्यान, कंगना रणौत काय बोलते, स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का, कंगनाचे बोलणे चुकीचे आहे. वादग्रस्त बोलते आणि संरक्षण मिळवते. नंतर पद्म पुरस्कारही मिळतो. कंगनाला मिळालेला पद्मश्री आणि संरक्षण पाहून विक्रम गोखलेही बोलायला लागले आहेत. आता त्यांनाही पद्म पुरस्कार मिळेल, असा टोला थोरातांनी लगावला.