शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. गेल्या वर्षीदेखील शिवसेनेचा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात संपन्न झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडणार आहे.
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे मंत्री, वरिष्ठ नेते, उपनेते, आमदार, महापौर, काही नगरसेवक या सोहळ्याला हजर राहणार असतील. गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात संपन्न झाला होता.
शिवसेनेचे विरोधकांना थेट आव्हान
उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यात जवळपास सगळ्याच ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. भाजपनं मात्र या बंदला विरोध केला आहे. त्यावर महाराष्ट्र बंदला विरोध करणारे मूर्ख आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. ‘लखीमपूरमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या पुत्रानं जीपनं शेतकऱ्यांना चिरडलं. महाराष्ट्रात बंदला विरोध करणाऱ्या कोणाकडे तशी एखादी जीप असेल, तर त्यानं ती रस्त्यावर आणून दाखवावी,’ असं थेट आव्हान राऊतांनी दिलं.