पणजी : आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं. तसंच यंदाचा अर्थसंकल्पही सामान्य माणसाला समर्पित असेल असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ आज लोकसभेत सादर केला. या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाचा जीडीपी ८ ते ८.५ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने जीडीपी ग्रोथ ९.२ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. मागील आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ७.३ टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी ग्रोथ ९.२ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे आज जो आर्थिक पाहणी अहवाल आपण पाहिला. त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेचं जे आऊटलूक आहे ते अत्यंत प्रॉमिसिंग दिसत आहे. मोठं रिव्हायव्हल त्यात पाहायला मिळत आहे. जी कोविडनंतर अत्यंत समाधानकारक बाब आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचं बजेट हे प्रो पिपल असं राहिलं आहे आणि मला विश्वास आहे की उद्या सादर होणारं बजेटही प्रो-पिपल असंच असणार आहे. हे सामान्य माणसाला समर्पित बजेट असेल. आमच्या इकॉनॉमिक रिव्हायव्हलला प्ल्यूएल करणारं बजेट असेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
पृथ्वीराज चव्हाण यांना टोला
पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला आहे की कोविड काळात देशाचा जीडीपी हा उणेमध्ये होता. असं असतानाही त्यांनी तो चार टक्के असा दाखवला. त्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण साहेब हे कुठलेही आकडे शोधून आणतात आणि कुठेही सांगतात. अर्धवट आकडे सांगायचे, सोयीचे आकडे सांगायचे आणि त्यावर बोलायचं. आकडे हे स्टॅटिस्टिक विभाग ठेवतो. तो रेकॉर्डचा भाग असतो. त्याप्रमाणेच हे आकडे समोर आले आहेत. त्यांना वाईट याचं वाटतं की, इतका कोविड झाला. जगाची अर्थव्यवस्था खाली गेली. तरीही भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वात वर कशी येतेय, याचं दु:ख त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे, असा जोरदार टोला फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.