पुणे : आषाढी वारी यंदाही बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी आज दिली. यंदा पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील वारी बसनेच जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १० महत्वाच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे.
दहा मानाचा पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानाला एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दोन्ही सोहळ्याच्या एकूण ६० लोकांना बसने पंढरपूरला जाता येईल. वाखरीपर्यंत हा पालखी सोहळा बसने जाईल तर पूजा गेल्या वेळप्रमाणे होईल. पूजेसाठी फक्त ५ जणांना परवानगी असेल. महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव साध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, अनेक जणांची यंदा पायी वारीसाठी मागणी होती. मात्र ते करू नये अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दहा मानाच्या पालख्या : १. संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर), २. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), ३. संत सोपान काका महाराज (सासवड), ४. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), ५. संत तुकाराम महाराज (देहू), ६. संत नामदेव महाराज (पंढरपूर), ७. संत एकनाथ महाराज (पैठण), ८. रुक्मिणी माता (कौडानेपूर – अमरावती), ९. संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर, अहमदनगर), १०. संत चांगटेश्वर महाराज (सासवड).