थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद; राणेंचं वाक्य चुकीचं नाही : चंद्रकांत पाटील
पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना काल अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना जामीन मिळाला, पण या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामन आलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी हिंसक आंदोलनही झाली. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचं काही चुकलं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. नारायण राणे यांचं वाक्य चुकलं नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना सांगण्यासाठी इतर पर्याय होते. तसेच, काल दिवसभर झालेली कारवाई सूडबुद्धीनं झालीय, हे सिद्ध झालं. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना सांभाळून बोललं पाहिजे असंही सांगितलं. पण, सत्याचाच विजय झाला. राज्य सरकार सारखं कोर्टाच्या थपडा खात आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.
मुंबईत पोपटाचा प्राण
राणेंना मुंबईत चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई हरली तर…? असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. या मुंबईतच पोपटाचा प्राण आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा आमच्या वेळीच निर्माण होतो. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय, असा आरोपही केला. याशिवाय, राणेंची तब्येत खराब असताना जेवणाच्या ताटावरुन त्यांना उठवणं अमानवीय असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले.