स्वत:ला गाव राखता येत नाही अन् राऊतांना आव्हान देतात!
हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट गेटल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले होते. आता पाटील यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टोला लगावला आहे. स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय; अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन ही खोचक टीका केली.
मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.