Top Newsराजकारण

हेरगिरी प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ

नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशीही राज्यसभा व लोकसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोठा गोंधळ झाला व त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले.

राज्यसभेत माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांना त्यांचे वक्तव्य मध्येच सोडून द्यावे लागले कारण सभागृहात खूपच गोंधळ सुरू होता. विरोधी पक्षाचे सदस्य मंत्र्यांनी पेगाससबाबत केलेल्या खुलाशावर सहमत नव्हते. तृणमूल काँग्रेसचे सदस्य शंतनू सेन यांनी मंत्री वैष्णव यांच्या हातातून त्यांच्या वक्तव्याचे पान हिसकावून घेतले आणि उपसभापती हरिवंश यांच्या आसनाच्या दिशेने भिरकावले. नंतर तिसऱ्यांदा कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित करावे लागले. लोकसभेतही राज्यसभेप्रमाणेच पूर्ण दिवस गोंधळ सुरू होता. परिणामी वारंवार कामकाज स्थगित करावे लागले. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोंधळात कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु फार वेळ ते चालवू शकले नाहीत. पेगासस आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर नाराज विरोधी पक्ष आसनाजवळ घोषणा देत राहिले.

राहुल गांधी आक्रमक

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांना पाळतीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांच्याकडून खुलासा हवा होता. त्यासाठी सरकार तयार नव्हते. त्याआधी राहुल गांधी यांच्या पुढाकाराने काँग्रेस सदस्यांनी संसद परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून धरणे देत ‘मोदी शेम शेम’च्या घोषणा दिल्या. यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ते असत्य, अन्याय, अहंकारावर अडून बसले आहेत. आम्ही सत्याग्रही, निर्भय, एकजूट येथे उभे आहोत. जय किसान!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button