Top Newsराजकारण

‘पेगासस’वरून आता माघार नाही; राहुल गांधींचा इशारा

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह १४ विरोधी पक्ष एकवटले

नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत चांगलंच घेरलं आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, त्यांची ही मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्याने पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह तब्बल १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने शिवसेना यूपीएचा एक भाग झाल्याचं बोललं जात आहे.

दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला.

या बैठकीत पेगासस प्रकरणावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरकारला १० दिवसांची नोटीस देण्यात येणार आहे. त्यावर राहुल गांधी यांची सही असेल. विरोधकांमध्ये आतापर्यंत एकमत नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पेगासस मुद्द्यावरून विरोधक पुन्हा एकदा एकत्रित आल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही संसदेत पेगाससवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. पेगासस प्रकरणाची अनेक देशात चौकशी होत आहे. मग भारतात का होत नाही? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, असं खरगे म्हणाले.

गृहमंत्र्यांनीच उत्तर देण्याची मागणी

पेगासस प्रकरणावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. हे प्रकरण विरोधकांनी संसदेत लावून धरलं आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे येत आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांकडे या प्रकरणाचं उत्तर मागत आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मुद्द्यावर उत्तर दिलं होतं. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनीच त्यावर उत्तर द्यावं, या मागणीवर विरोधक अडून बसले आहेत.

मोदी-शहांकडून देशाच्या लोकशाहीवर घाव

पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं. पण हे हत्यार देशाविरोधातच वापरलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला आहे, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढवला आहे.

पार्लमेंट चेंबरमध्ये काँग्रेससह १४ विरोधी पक्षांची बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधींसह या १४ पक्षांचे नेते मीडियाला सामोरे गेले. यावेळी राहुल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील सर्व विरोधक एकवटले आहेत. सर्व पक्षाचे नेते आहेत. आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा केवळ एकच प्रश्न आहे. केंद्र सरकारने पेगाससची खरेदी केली की नाही. त्यांनी होय किंवा नाही या शब्दात उत्तर द्यावं. केंद्र सकारने देशातील नागरिकांची हेरगिरी केली की नाही, याचंही उत्तर होय किंवा नाही या शब्दात द्यावी. आम्हाला हे जाणूनच घ्यायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

पेगाससवर संसदेत चर्चा होणार नाही, असं आम्हाला केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. मोदी सरकारने तुमच्या मोबाईलमध्ये एक शस्त्र टाकलं आहे. माझ्याविरोधात या हत्याराचा वापर केला गेला. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्या हत्याराचा वापर केला. प्रेस, कार्यकर्ते आणि इतरांच्या विरोधातही या हत्याराचा वापर करण्यात आला. त्यावर संसदेत चर्चा का होत नाही? हा प्रश्न आहे. आम्ही संसदेत गोंधळ घालत आहे असा आरोप लावला जात आहे. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही आमची जबाबदारी पार पडत आहोत. केवळ काँग्रेस नेता म्हणून नव्हे तर सर्वच नेते हे सांगतील, असंही ते म्हणाले.

हे हत्यार आपल्या देशाविरोधात वापरलं गेलं. या हत्याराचा वापर दहशतवाद्यांच्या विरोधात, देशद्रोहींच्या विरोधात करायला हवा होता. पण लोकशाहीच्या विरोधात त्याचा वापर का केला जात आहे. आपल्याच देशाच्या विरोधात हा वापर का केला जात आहे? असा सवाल करताना आम्ही आता पेगाससवर चर्चा करणार नाही असं म्हटलं तर पेगासस प्रकरण दाबलं जाईल. त्यावर पुन्हा चर्चा होणार नाही. माझ्यासाठी हे प्रायव्हसीचं प्रकरण नाहीच. आमच्यासाठी हे राष्ट्रवादाचं प्रकरण आहे. हे हत्यार लोकशाहीच्या विरोधात वापरलं आहे. हा राष्ट्रद्रोही प्रकरण आहे. मोदी आणि शहांनी देशाच्या लोकतांत्रिक आत्म्यावर घाव घातला आहे, त्यामुळे आम्हाला त्यावर चर्चा हवी आहे. त्यामुळेच चर्चा झाल्याशिवाय आम्ही कुठेच जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button