Top Newsराजकारण

शरद पवारांशी सकारात्मक चर्चा, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकरच तोडगा : संजय राऊत

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणीही या आंदोलकांशी चर्चा करायला आलेले नाहीत. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर एसटी संपाबाबत लवकरच तोडगा निघेल, असे म्हटले आहे.

राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतंय आणि का भडकवतंय त्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण, का करतंय यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. जे जे त्यांच्यासाठी करता येणं शक्य आहे ते सरकार करत आहे. कालच शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांनी चर्चाही केली आहे. मला आजच्या पवारसाहेबांसोबतच्या बैठकीतून असं समजलं की त्यांनी काही सकारात्मक सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली. शरद पवारांशी झालेल्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवारांसोबत परमबीर सिंग प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही आणि त्यानुसार शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, ठाकरे सरकारचे वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचे धोरण आहे. अनिल परब यांच्या वक्तव्यात काहीच बदल नाही. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथे यावे आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावे. हे काय कुठले अतिरेकी इथे येऊन बसले आहेत का, त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, या शब्दांत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला.

शरद पवारांच्या नेमक्या सूचना काय?

शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनिल परब यांना महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती आज समोर आलीय. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन आणि सुविधा आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि सुविधा देण्याबाबतीत समान स्तरावर असल्याचं समोर आलं. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, अशी सूचना पवार यांनी परबांना दिल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्यावी, असा सल्ला पवारांनी दिल्याचं कळतंय.

– एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्या
– पगारवाढ देताना अगदी कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा
– पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो आर्थिक ताण पडेल, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी वर्षभराची तरतूद करावी
– आर्थिक भार सोसावा लागेल तरी चालेल पण भरघोस पगारवाढ द्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button