Top Newsआरोग्य

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता नाही, मात्र…? राजेश टोपेंनी दिला इशारा

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाईट कर्फ्यूची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच लॉकडाऊन कधी लावला जाऊ शकतो याची माहितीच दिली आहे.

राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना संसर्ग, ओमिक्रॉनचा धोका, लॉकडाऊन आणि निर्बंध यावर भाष्य केलं. यापुढे लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लावण्याचं ठरवणार आहोत. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.

दुपटीनं रुग्ण वाढण्याचं प्रमाण असं सुरु राहिलं, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं आहे. परदेशात लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ऑमिक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं होतं, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button