सचिन वाझेंसोबत ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचेही वास्तव्य
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणखी धक्कादायक माहिती उघड

मुंबई : मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करत असून मुख्य आरोपी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. दररोज याप्रकरणात नवी ट्विस्टही येत आहे. याचपार्श्वभूमीवर सोमवारी एनआयएच्या टीमने घटनेचे नाट्यरुपांतर केले. यावेळी वझे ज्या हॉटेलमध्ये ५ दिवस मुक्काम ठोकून होते त्या ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांना नेण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझेंबरोबर एक महिलाही असल्याचे समोर आले आहे. यामुळे ती महिला कोण आहे? याचा तपास एनआयएने सुरू केला आहे.
ट्रायडंट तपासादरम्यान, वाझे यांनी सुशांत सदाशिव खामकर या नावाने बनावट आधारकार्ड बनवल्याचे समोर आले. तसेच याच नावाने ते १६ ते २० फेब्रुवारीपर्यंत हॉटेलमध्ये मुक्कामी होते हे देखील स्पष्ट झालं आहे. दरम्यान, एनआयएचे पथक हॉटेलमध्ये तब्बल तीन तास वाझेंची चौकशी करत होते. यादरम्यान, अनेक नवीन खुलासे झाले आहेत. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही एनआयएने ताब्यात घेतले आहेत. या सीसीटीव्हीत वाझे यांच्याबरोबर एक महिलाही दिसत असून तिलाच त्यांनी नोटा मोजण्याचे मशीन दिले होते. यामुळे अंबानी स्फोटक प्रकरणाचा कट हॉटेलमध्येच रचल्याचा एनआयएला संशय आहे. तसेच या कारस्थानात वाझे एकटेच नसून संबंधित महिलाही त्यात सामील असल्याची शक्यता असल्याने तिचा शोध घेण्यात घेत आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जाताना वाझे यांच्याकडे पाच बॅगा होत्या. ज्यातील एका बॅगमध्ये जिलेटीनच्या कांड्या असाव्यात असा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.