राजकारण

राम मंदिराच्या जमीन खरेदी बाबत ट्रस्टने केंद्र सरकार आणि संघाला पाठवला अहवाल

नवी दिल्ली : अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठीच्या जागेच्या खरेदीवरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांमुळे राम मंदिर ट्रस्ट मोठ्या अडचणीत सापडलं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं आता या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालात ट्रस्टनं विरोधकांचं कटकारस्थान असल्याचं नमूद केलं आहे.

राम मंदिराच्या निर्माणासाठी लागणाऱ्या जमिनीची खरेदी नेमकी कशी झाली याची सविस्तर माहिती ट्रस्टनं अहवालात नमूद केली आहे. भाजपच्या विरोधकांकडून राम मंदिर ट्रस्टवर जमीन खरेदीबाबतच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात येत असल्याचं ट्रस्टनं म्हटलं आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं अहवालात जमीन खरेदी संदर्भातील वस्तुस्थिती मांडली आहे. खरेदी करण्यात आलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे जमिनीचे दर अधिक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ज्या जमिनीची खरेदी झाली आहे ती १,४२३ रुपये प्रतिस्वेअर फूट दरानं खरेदी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या जमीन खरेदीसाठी आज नाही, तर गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती. यात एकूण ९ लोकांचा समावेश आहे, असंही नमूद करण्यात आलं आहे.

समाजवादी पक्ष, आम आदम पक्ष आणि काँग्रेसनं राम जन्मभूमी ट्रस्टवर जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या जमिनीची किंमत १० मिनिटांपूर्वी २ कोटी रुपये इतकी होती. तिच जमीन तब्बल १८ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधकांनी जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचा ट्रस्टनं अपमान केला असून ट्रस्टच्या सदस्यांनी जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button